Agricultural loans शेतीकर्ज घेण्यापुर्वी





शेतक-याचे उत्पन्न दुप्पट व्हावे हे ध्येय सरकारने पुढच्या पाच वर्षासाठी ठेवले आहे या दृष्टीने शासकिय  योजनाही राबविण्यास सुरुवात झाली आहे, असे असले तरी आता आपण शेतक-यांनीही त्यादिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे.
शेतीच्या उत्पादन वाढावे या हेतुने पुढील घटक महत्वाची भुमिका बजावू शकतात त्यामधे,
  1. शेतीविषयक असणारे तांत्रिक ज्ञान
  2. चांगल्या दर्जाचा निविष्ठा (शेतीसाठी लागणा-या आवश्यक गोष्टी)
  3. उत्पादन पिकाला योग्य भाव व बाजारपेठ
  4. भांडवलाची उपलब्धता
यासर्वांमध्ये भांडवलाची उपलब्धता करणे हे अतिशय गरजेचे आहे. उत्पादन वाढावे या दृष्टीने अतिरिक्त पैशांची व्यवस्था करणे अनिवार्यच आहे. सरकारने तयार केलेल्या योजनांचा उपयोग करावयाचा असल्यास कर्जाच्या सुविधांचा उपभोग शेतक-याने घेतला पाहिजे.
सर्व व्यापारी तसेच राष्ट्रियकृत बॅंका यांना एकुण कर्जाच्या ४० % कर्ज हे पायाभुत क्षेत्र म्हणजेच कृषी, लघु, कुटिरोद्योग क्षेत्र, शिक्षण, गृह कर्ज व निर्यात उद्योग यांना देणे बंधनकारक असते त्यातही किमान १८% हे शेतीक्षेत्राला देणे अनिवार्य आहे.
असे असले तरीही हे ४०% कर्जाचे वाटप करताना बॅंकांची खरोखरच दमछाक होते. याचे कारण म्हणजे कृषी कर्जपुरवठ्याविषयी असलेली उदासीनता.
अनेक शेतकरी कर्ज घेण्याच्या फंदातच पडत नाहीत, तर काही शेतकरी कर्जासाठी लागणारी यादी बघुनाच गांगरुन जातात व नंतर त्याची पुर्तता करण्यामध्येच त्यांची दमछाक होते, कालांतराने कर्जाची वाटच ते सोडुन देतात. सद्यस्थितीत एकुण शेतक-यांच्या जवळपास २५% शेतकरीच कर्जाचा लाभ घेतात. यासाठीच शेती कर्जाचा अभ्यास करुन मगच कर्जाचा अर्ज करावा.
सोप्या शब्दात सांगायचं तर कर्जाच्या उपयोगावरुन कर्जाचे प्रकार पडतात, म्हणजेच
 
1.किसान क्रेडिट कार्ड /पिक कर्ज:
पिक उत्पादनाच्या दैनंदिन गरजांसाठी कर्ज घ्यायचे असल्यास त्याला पिक कर्ज किंवा किसान क्रेडिट कार्ड असे म्हणले जाते.या कर्जामध्ये बॅंकेकडुन आपल्याला मिळणा-या रकमेची मर्यादा ठरवली जाते. हे कर्ज एका वर्षाने एकदम फेडावे लागते.या कर्जासाठी उभे पिक तारण ठेवले जाते तसेच  काही बॅंकांमध्ये जमिनही तारण/बोजा ठेवला जातो.
अ) कर्जदार व जामीनदारांचा सात-बाराउतारा, ८ अ चा उतारा, फेरफार उतारा.
ब) पीक लागवडीसंदर्भात तलाठ्याचे प्रमाणपत्र. (ऊस पीक असल्यास कारखान्याचे लागण पत्र)
क) शेतीसंदर्भात सविस्तर अहवाल. (आजपर्यंतच्या उत्पन्नाचा तपशील. आगामी तीन वर्षांचे अंदाजपत्रक.)
ड) अन्य बॅंका, सहकारी बॅंका व पतसंस्थांचा बेबाकी दाखला.
ई) जमिनीचे अद्ययावत किमतीसंबंधी प्रमाणपत्र व जमिनीवर कोणताही बोजा नसल्याचा दाखला.
  1. प्रकल्पासाठी कर्ज / टर्म लोन:
त्याचबरोबर एका विशिष्ट प्रकल्पासाठीही कर्जपुरवठा घेऊ शकतो उदा. गुरे खरेदी करण्यासाठी डेअरी लोन, ट्रॅक्टर लोन, फार्म मशिनरी लोन, इरिगेशन लोन वगैरे यामध्ये शक्यतोवर एकुण प्रकल्प खर्चाच्या ७५ ते 90% पर्यंत वित्तपुरवठा मिळतो व जमिनीच्या तारणाबरोबरच प्रकल्प खर्चातील विकत घेतलेल्या वस्तु तारण म्हणुन ठेवण्यात येतात.
 
अ) कर्जदार व जामीनदारांचा सात-बाराउतारा, ८ अ चा उतारा, फेरफार उतारा.
ब) पीक लागवडीसंदर्भात तलाठ्याचे प्रमाणपत्र. (ऊस पीक असल्यास कारखान्याचे लागण पत्र)
क) शेतीसंदर्भात सविस्तर अहवाल. (आजपर्यंतच्या उत्पन्नाचा तपशील. आगामी तीन वर्षांचे अंदाजपत्रक.)
ड) अन्य बॅंका, सहकारी बॅंका व पतसंस्थांचा बेबाकी दाखला.
इ) जमिनीचे अद्ययावत किमतीसंबंधी प्रमाणपत्र व जमिनीवर कोणताही बोजा नसल्याचा दाखला.
ई) प्रकल्प अहवाल व अहवालासाठी लागणा-या वस्तुंचे कोटेशन
 
हे लक्षात ठेवा:
  • शक्यतो नामांकित बॅंकांकडुनच किंवा सहकारी सोसायटीकडुनच कर्ज घ्यावे.
  • बॅंकेच्या शिफारशी एवढेच कर्ज घ्यावे व शक्यतो एकाच बॅंकेकडुन कर्जव्यवहार करावे.
  • कर्ज घेताना सात-बा-यात नावे असणा-या सर्व व्यक्तींची संमती घ्यावी लागते.
  • कर्ज घेताना लागणारी सर्व कागदपत्रे अद्यावत(नविन ) असावित
  • कर्जदेण्यासाठी देण्यात येणा-या कागदपत्रांमध्ये आपले नाव बरोबर आहे कि नाही याची पडताळणी करावी.
  • कर्ज मंजुर झाल्यानंतर मंजुर पत्रातील (सॅंक्शन लेटर)सर्व अटी काटेकोरपणे वाचाव्या व मगच त्यावर सही करुन पुढील प्रक्रिया करावी.
  • व्याजदराची संपुर्ण माहीती घेऊन सर्व प्रथम बॅंकेकडुन रिपेमेंट शेड्यल्ड घ्यावे.
  • कर्ज रक्कम मर्यादा जास्त असली तरी गरजेपुरतेच रक्कम काढावी व शेतीकामासाठीच त्याचा वापर करावा.
  • कर्ज घेतलेल्या बॅंकेत नियमीत भेट देऊन स्टेटमेंट ऑफ अकाऊंट घ्यावे.
  • उत्पादन विक्रितुन मिळणा-या रकमेतुन नियमित परतफेड करावी शक्यतो परतफेडीच्या तारखेपुर्वीच काही दिवस अगोदर परतफेड करण्याचा प्रयत्न करावा.

SHARE THIS

->"Agricultural loans शेतीकर्ज घेण्यापुर्वी"

Search engine name