Electrical Safety विद्युत सुरक्षितता : सर्वोच्च प्राथमिकता


'विद्युत सुरक्षितता : सर्वोच्च प्राथमिकता' हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या वतीने ११ ते १७ जानेवारी या कालावधीत राज्यभर 'विद्युत सुरक्षा' सप्ताहाला प्रारंभ झाला आहे .

विद्युत सुरक्षा सप्ताहात मुख्यत्वे विद्युत संचमांडणी सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे, काय करू नये, विद्युत उपकरणे कशी हाताळावीत, उद्वाहनांचा सुरक्षित वापर करण्याबद्दलचे निकष, सुरक्षेच्या बाबी लक्षात घेऊन बनवले गेलेले नियम, गुणवत्ता, प्रशिक्षण, नियम न पाळल्यास होऊ शकणारी कारवाई अशा अनेक मुद्यांवर प्रकाशझोत टाकण्याचे महत्त्वाचे काम केले जात आहे.

विद्युत विभागात काम करणारे अधिकारी, कर्मचारी आदींच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, तंत्रनिकेतने, महाविद्यालये इ. ठिकाणी जाऊन प्रबोधन करणे, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करणे, पथनाट्य सादर करणे यासारखे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

घरगुती वीज ग्राहकांसाठी सुरक्षा सूचना
• वीजेचे दिवे, ट्यूबलाईट, फ्यूजतार व इतर घरगुती उपकरणे बदलण्याच्या कामाखेरीज विद्युतसंच मांडणीची सर्व कामे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त परवानाधारक विद्युत ठेकेदाराकडूनच करुन घेणे बंधनकारक आहे. तात्पुरते वायरिंग करून वीजेचे दिवे व उपकरणे वापरणे नेहमीच धोक्याचे असते.
• लोंबकळते व अयोग्य पद्धतीने जोड दिलेले वायरिंग धोकादायक असते.
• विद्युत प्लग, तारा व त्याला जोडलेली उपकरणे लहान मुलांपासून दूर राहतील याची काळजी घेणे गरजेचे आहे.

शेतीपंपासाठी विद्युत सुरक्षा उपाय
• शेतीपंपासाठी विद्युतसंच मांडणी शासन मान्यताप्राप्त परवानाधारक विद्युत ठेकेदाराकडूनच करून घ्यवी.
• शेतीपंपासाठी दोन स्वतंत्र अर्थिंग करून घेऊन ते कमीतकमी ८ गेजच्या भिन्न व अलग जी.आय. तारेने मोटार, मेनस्विच व त्याची लोखंडी पेटी व इतर उघडे धातूचे भाग यांच्याशी जोडावेत.
• कमी व्होल्टेजमुळे मोटार स्टार्टर ट्रीप होत असेल तेव्हा तो वायरिंग यंत्रणेतून अलग करून मोटार चालविण्याचा प्रयत्न केल्यास मोटार जळण्याचा धोका संभावतो.
• विद्युत वाहिन्यांच्या खाली कोणत्याही वस्तू अथवा शेतीमाल साठवू नये.
• विद्युत वाहिन्यांच्या जवळ अथवा सानिध्यात खोदकाम करू नये व झाडे लावू नये.
• शेतीपंपासाठी वीज पुरवठादाराने अधिकृतरित्या दिलेली वीजजोडणीच वापरावी.
• शेतातील विद्युत वाहिनीच्या खांबाला अथवा ताणतारेला जनावरे बांधण्याचे टाळावे.

बहुमजली इमारतीतील विद्युत संचमांडणी
• १५ मीटरपेक्षा उंच इमारतीतील (५ मजल्यापेक्षा उंच) विद्युत संचमांडणीस विद्युत पुरवठा करण्यापूर्वी ती विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून तपासून घेऊन त्यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
• केबल डक्टमधून इतर कोणतेही पाईप उदा. फायर फायटिंग, गॅस इ. नेऊ नये त्यामुळे आग, विद्युत धक्का इत्यादी धोके निर्माण होऊ शकतात.
• फ्लॅटमधील वायरिंग करताना कमीत कमी १ पॉवर सर्किट व फ्रीज, वॉशिंग मशीनसाठी वेगळे तसेच लाईट, पंखे यासाठी वेगवेगळे नियंत्रक स्विच वापरावेत.
• मीटर रूममध्ये कपडे, इतर वस्तू, ज्वालाग्राही पदार्थ ठेवू नये.
उद्वाहन वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचे
• जगात मोठ्या प्रमाणात उद्वाहनाचा वापर होतो.
• उद्वाहन येताना दिसणारे सिग्नल व आगमन घोषणांकडे लक्ष द्यावे.
• वारंवार कॉल बटन दाबल्याने उद्वाहन लवकर येणार नाही.
• उद्वाहन चालू झाल्यावर दाराला स्पर्श करू नये.
• आजकालची उद्वाहने ही मजल्याच्या योग्य पातळीवर येऊन थांबतील, अशा प्रकारे बनवलेली असतात. तरीदेखील उद्वाहन वर किंवा खाली थांबू शकते. अशा वेळी न बघता उद्वाहनाच्या आत किंवा बाहेर पडू नये.
• वय किंवा लिंगानुसार उद्वाहनात जाणे अथवा बाहेर येणे ठरवू नका.
• १२ वर्षाखालील मुलांना एकट्याने उद्वाहनात प्रवास करू देऊ नये.
सर्वांसाठीच महत्त्वाच्या सुरक्षा सूचना
• वीजेचे काम करीत असताना हातात रबरी मोजे घालावे.
• सेफ्टी शूज वापरावे.

विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सर्वच ठिकाणची नादुरुस्त उपकरणे, जुने वायरिंग बदलून सर्व काही योग्य असल्याची खात्री करू या. विद्युत सुरक्षा सप्ताह हा सप्ताहापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण वर्षभर आपण सतर्क राहू व इतरांनाही सुरक्षित ठेवू.

- स्मिता पाटील
माहिती स्रोत: महान्युज


https://ift.tt/eA8V8J from Social Welfare Feed https://ift.tt/2OtN5Vk

SHARE THIS

->"Electrical Safety विद्युत सुरक्षितता : सर्वोच्च प्राथमिकता"

Search engine name