मुद्राच्या साथीने भविष्याची उजळली दिशा


सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या एम.आय.डी.सी. जवळ राहणारे सुशांत पिंगुळकर हे पूर्वी आयकर संबंधित काम करत असत. या कामातून त्यांना जेमतेम उत्पन्न मिळत असे. कौटुंबिक जबाबदारी पेलण्यासाठी मात्र ते पुरेसे नव्हते. या कामानिमित्ताने त्यांचा बँकेशी संपर्क येत होता. यातूनच त्यांना मुद्रा बँक योजनेविषयी माहिती समजली आणि उज्ज्वल भविष्याचा जणू मार्गच सापडला.

या योजनेच्या माध्यमातून पिंगुळकर यांनी एनएसडीएल चे केंद्र सुरु करण्यासाठी कर्ज घेतले. यापूर्वी त्यांना आयकर संबंधी काम करत असताना इतरांवर अवलंबून रहावे लागत होते. तसेच कणकवली किंवा सावंतवाडी या ठिकाणी वारंवार जावे लागे. तालुक्यात कोठेही एनएसडीएल चे केंद्र नव्हते. त्यामुळे त्यांना व्यवसाय करताना अडचणींना सामोरे जावे लागत असे. तसेच उत्पन्नही कमी होते. पण, आता त्यांनी एनएसडीएल चे स्वत:चे केंद्र सुरु केल्यामुळे त्यांचा व्यवसायही चांगला चालतो, तसेच लोकांना चांगल्या प्रकारची सेवा पुरवता येत असल्याचे समाधानही मिळत असल्याचे ते सांगतात.

एम.कॉम पर्यंत शिक्षण झालेल्या सुशांत पिंगुळकर यांनी या योजनेअंतर्गत तीन लाखांचे कर्ज काढून हे केंद्र सुरु केले. या बाबत बँक ऑफ इंडिया कडून मोलाचे सहकार्य झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या केंद्राच्या माध्यमातून आज ते वर्षाला अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळवतात. या शिवाय त्यांनी दोन मदतनीस ठेवले असून, आपल्यासह आणखी दोन व्यक्तींना यातून रोजगार मिळाल्याचा सुशांत यांना आनंद आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारल्याने आई, वडील, पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी सध्या ते समर्थपणे पेलत आहेत.

मुद्रा योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुबता आल्याचे सुशांत पिंगुळकर हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
माहिती स्रोत: महान्युज


SHARE THIS

->"मुद्राच्या साथीने भविष्याची उजळली दिशा"

Search engine name