सोलर पॅनल बसविण्याचा उद्योग Solar Panel Installation Industry

 
उन्हापासून झाला १ कोटी रुपयांचा फायदा

प्रचंड उष्णता ( ऊन – उन्हाळा/गर्मी ) यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश होरपळून निघाला पण आपल्याकडे काहीजण असे देखील आहे ज्यांनी ऊन, उन्हाळा, उष्णता, सूर्यकिरण यामुळे हैराण, परेशान न होता विपरीत परिस्थितीवर मत करत परिस्थितीला मुकुल करत एक सक्षम रोजगार पर्याय निर्माण केला आहे .

भविष्यात सुर्यकिरणांचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे, या दूरदृष्टीने वर्ध्याच्या एका विद्युत अभियंत्याने सोलर पॅनल बसविण्याचा उद्योग सुरू केला. 3 लाख रुपयांपासून सुरू केलेला त्याचा हा उद्योग आज 1 कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीवर पोहचला आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळालेल्या या यशस्वी उद्योजकाने स्वत: सोबतच 8 बेरोजगारांनाही रोजगार उपलब्ध करून दिलाय.

केळझर येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले सुनील गुंडे आणि सचिन ढोणे. विद्युत अभियांत्रिकीची पदविका घेतल्यानंतर पुणे आणि नंतर नागपूर येथे चांगल्या पगाराची नोकरी सुरू असतानाच सुनील गुंडे यांच्या डोक्यात स्वतःचा व्यवसाय करण्याचे मनसुबे सुरू होते. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःची बुद्धी आणि श्रम स्वतःच्या विकासासाठी वापरल्यास आपण अधिक यशस्वी होऊ शकतो, असा त्यांचा ठाम विश्वास होता. याच झपाटलेपणातून एक दिवस स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. सचिन ढोणे या मित्राला सोबत घेऊन एस & एस फ्युचर एनर्जी ट्रेडिंग कंपनी 2015 मध्ये सुरू केली. चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यामुळे दोघांच्याही घरचे त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे घरून आर्थिक पाठिंब्याचा विचारही त्यांनी केला नाही. पण त्यांचा इरादा पक्का होता. त्यामुळे स्वतः जमवलेले पैसे थोडे – थोडे वापरत त्यांनी काम सुरू केले. मिळेल ते काम स्वीकारले. लहान, मोठे याचा विचार केला नाही. कठोर परिश्रमाला घाबरले नाहीत. पण तरीही उद्योग पुढे नेण्यासाठी त्यांना भांडवलाची आवश्यकता होतीच.

सन 2017 मध्ये केळझर येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सुनील गुंडे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेमधून कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला. उद्योगाचा व्यवस्थित प्रस्ताव तयार करून दिला. त्यांची कामाप्रति असलेली बांधिलकी पाहून बँकेने 3 लक्ष रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर लगेच वन विभागाचे सोलर पथ दिवे बसविण्याचे काम त्यांना मिळाले. मिळालेले कर्ज आणि कामामुळे त्यांच्या व्यवसायाला बूस्ट अप मिळाले आणि नंतर सुनील गुंडे यांनी मागे वळून बघितलेच नाही.

नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचे 40 लाखाचे मोठे काम त्यांना मिळाले. हे काम त्यांनी आंध्रप्रदेश आणि उत्तर प्रदेश मध्ये जाऊन पूर्ण केले. कामातील तत्परता, त्याविषयीची बांधिलकी, श्रम करण्याची तयारी आणि तत्पर सेवा या त्यांच्या व्यावसायिक गुणांमुळे त्यांच्या कंपनीला मोठे काम मिळत गेले. आज त्यांची कंपनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातही सोलर पॅनल बसविण्याचे काम करते. 


डिसेंबर 2017 मध्ये त्यांनी कंपनीचे ऑफिस वर्धेत सुरू केले, तेव्हा पहिल्यांदा कुटुंबियांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. आज कंपनीची उलाढाल 1 कोटी पर्यंत पोहचली आहे. शिवाय 3 वर्षातच कंपनीला आयएसओ मानांकन सुद्धा मिळाले आहे. त्यामुळे कंपनीच्या प्रतिमा निर्मितीसाठी त्याचा फायदा होतोय.

आज या दोन मित्रांच्या कंपनीत 2 विद्युत अभियंते, 5 तांत्रिक सहाय्यक, आणि कार्यक्षेत्रातील मदतनीस अशा 10 कर्मचारी काम करतात. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन त्याचा योग्य उपयोग केल्यामुळे आज या दोन मित्रांमुळे 10 कुटुंबांचे भरण पोषण होत आहे, असे म्हटल्यास अतिशोयक्ती होणार नाही.SHARE THIS

->"सोलर पॅनल बसविण्याचा उद्योग Solar Panel Installation Industry"

Search engine name