रस्ते अपघात



सकाळी सकाळी कानावर पडलेली एखादी गाण्याची लकेर दिवसभर कानात रुंजी घालत रहाते... कधी कधी अशा गाण्यात काही संदेश असतो असंही वाटून जाते.

राजकपूरचा ड्रिमप्रोजेक्ट असलेल्या मेरा नाम जोकर चित्रपटातील गाण्याने आज माझ्या कानावर ताबाच घेतला असं म्हणायला हरकत नाही त्या गाण्याचे, बोल आहेत.

ये भाई जरा देख के चलो.... आगे भी नही पिछे भी...
आता गाणं कानात वाजायला लागताच त्याच्याशी निगडीत बाबी झटपट समोर दिसायला लागतात असं म्हणतात गाणं ऐकताना मला रस्त्यावर बघितलेले अपघात माझ्या नजरेसमोर दिसायला लागले.

अपघात.. हा शब्द अगदीच अचानक आणि अकल्पीत असं काही घडणं या अर्थाने आपल्याकडे आलेला आहे मात्र रस्त्यावर घडणारे अपघात आणि अपघातांच्या मालिका बघितल्यावर मनाला आतून बाहेरुन धक्का बसतो.
आपल्याकडील अपघातांची कारणमिमांसा करताना जाणवतं की आपली बेशिस्त वृत्ती आणि बेदरकारपणा, शिस्त न पाळणे आदी अनेक कारणांनी आपल्याकडे अपघात होतात. अपघात यांत्रिक दोषाने होण्यापेक्षा ते अधिक प्रमाणात होतात मानवी दोषाने हे चुकीचेच आहे. आपल्याकडे होणाऱ्या अपघातात दरवर्षी 1 लाख 50 हजारांहून अधिक जण प्राण गमावतात. यात सर्वाधिक अपघात हे दुचाकी वाहनांचे आहेत. भरधाव वेगात गाडी चालविणे अनेकांना आवडते मात्र अशा स्थितीत सुरक्षा साधनांचा वापर करणे अत्यावश्यक असते.

एखाद्या यांत्रिक चुकीने गाडीचा तोल जाणे, संतुलन बिघडणे, नियंत्रण सुटणे तसेच रस्त्यात अचानक वाहनासमोर कुणी येणे अशा स्थितीत अपघात हा टाळताच येत नाही. अशा वाहनाचालकाने किमान हेल्मेट घातलेले असेल तरी नुकसान कमी प्रमाणात होते. किमान प्राण वाचण्याची शक्यता यात असते.

वाहन चालकांमध्ये वाहनाचे पूर्ण ज्ञान नसणे तसेच वाहतूक नियमांची पूर्ण माहिती नसणे आणि मुळातच वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देखील घेतलेले नसणे ही भारतात होणाऱ्या अपघातांमागील काही महत्वाची कारणे आहेत.दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट वापरण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही शहरात झाली याला सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. आपली नियम झुगारुन देण्याची किंवा नियम न पाळण्याची मानसिकता यामागे आहे असे म्हणायला काहीच हरकत नसावी.

जगात इतर देशात अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी आहे याला कारण म्हणजे अपघात होऊ नये यासाठी उत्तम खबरदारी घेतली जाते. नियम हे आपल्या सुरक्षेसाठी आहेत अशी भावना शालेय स्तरापासून प्रत्येकात रुजलेली आपणास दिसते आपण अपघात बघितल्यावर हळहळ व्यक्त करतो आणि कामाला लागतो. पुढच्यास ठेस मागचा शहाणा ही वृत्ती आपल्या कृतीत येत नाही त्यामुळे ये रे माझ्या मागल्या म्हणत बेदरकारपणे सर्व जण वाहने हाकतात. कुठंतरी थांबून विचार करा. आयुष्य इतकही स्वस्त आहे. बघा... समजून घ्या आणि सावध रहा.

- प्रशांत दैठणकर
माहिती स्रोत: महान्युज



SHARE THIS

->"रस्ते अपघात"

Search engine name