विविध मार्गांनी मिळू शकणारे करमुक्त उत्पन्न Tax Free Income
विविध मार्गांनी मिळू शकणारे करमुक्त उत्पन्न_
------------------------------
आयकर कायद्यानुसार वर्षभरात सर्व मार्गांनी मिळालेल्या पैशांची आपल्या उत्पन्नात गणना होते. विविध वजावटी आणि शून्यकर असलेले उत्पन्न वगळून वरील उत्पन्नावर कर भरावा लागतो हे आपल्याला माहीत आहेच. असे असले तरी आयकर कायद्यातील कलम १० नुसार अनेक उत्पन्न काही मर्यादेत किंवा पूर्णतः करमुक्त आहेत. त्यांची माहिती करून घेऊयात.

*१. ग्रॅच्युटी :* सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नियमानुसार ग्रॅच्युटीची रक्कम मिळते. ही रक्कम शेवटी मिळणाऱ्या मासिक पगारास (मूळ पगार + महागाई भत्ता) १५/२६ ने गुणून त्यास झालेल्या सेवाकालाच्या वर्षाने गुणले असता येणाऱ्या रकमेच्या एवढी तरी किमान असतेच. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी पूर्ण रक्कम आणि खाजगी कर्मचाऱ्यांना मिळणारी २० लाख रुपये (ही मर्यादा नजीकच्या काळात ३० लाख रूपये होईल) एवढी रक्कम कलम १०(१०) नुसार करमुक्त आहे.

*२. स्वेच्छानिवृत्तीची रक्कम :* आयकर कलम १०(१०/C) नुसार स्वेच्छानिवृत्तीची भरपाई म्हणून मिळणारी रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्णपणे तर इतरांना ५ लाख रुपयांच्या मर्यादेत करमुक्त आहे. मांत्र ही सवलत पूर्ण आयुष्यात एकदाच घेता येते.

*३. भारतीय नागरिकांना परदेशात काम करण्याबद्धल मिळणारे भत्ते :* आयकर कलम १०(७) नुसार जे भारतीय नागरिक परदेशी काम करतात त्याबद्दल त्यांना मिळणारे भत्ते हे पूर्णपणे करमुक्त आहेत.

*४. शेअर आणि इक्विटी म्युच्युअल फंडावरील डिव्हिडंड :* शेअरबाजारात नोंदणीकृत कंपन्यांवर मिळणारा १० लाख रुपयांपर्यंत डिव्हिडंड आणि १ एप्रिल २०१८ नंतर इक्विटी म्युच्युअल फंडावर मिळणारा डिव्हिडंड हा १०% डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूशन टॅक्स कापून घेऊन मिळत असल्याने कलम १०(३४) नुसार लाभार्थींना पूर्णपणे करमुक्त आहे.

*५. शेतीपासून मिळालेले उत्पन्न :* आयकर कलम १०(१) नुसार शेतीपासून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे. परंतू हे उत्पन्न ५ हजारांहून अधिक असले तर एकूण करपात्रता निश्चित करण्यासाठी एकूण उत्पन्नात मिळवण्यात येते. ग्रामीण भागातील शेतजमीन विक्री केल्याने झालेला दीर्घ मुदतीचा फायदा कलम २(१४) नुसार आणि विकास कामासाठी सक्तीने संपादित जमिनीचा मोबदला कलम १०(३७) नुसार पूर्णपणे करमुक्त आहे.

*६. सन्मान वेतनधारक :* वीरचक्र, महावीरचक्र आणि परमवीरचक्र विजेते किंवा सरकारी मान्यताप्राप्त शौर्य पदक विजेते किंवा त्यांचे वारस यांना मिळणारे रोख पुरस्कार, सन्मानवेतन आणि निवृत्तीवेतन कलम १०(१८) नुसार पूर्णपणे करमुक्त आहे .

*७. पार्टनरशिप मधून मिळालेले उत्पन्न :* पार्टनरशिप फर्मने व्यक्तीप्रमाणेच स्वतंत्रपणे टॅक्स भरला असेल तर कलम १०(२/A) नुसार भागीदारांना मिळालेल्या लाभावर कर भरावा लागत नाही.

*८. हिंदू अविभाज्य कुटुंबाचे उत्पन्न :* हिंदू अविभाज्य कुटुंबाचा घटक म्हणून मिळालेल्या रकमेवर कलम १०(२)नुसार कोणताही कर भरावा लागणार नाही.

*९. करमुक्त व्याजदराचे रोखे :* सरकारने मान्यता दिलेल्या या विशेष रोख्यावरील व्याज कोणत्याही मर्यादेशिवाय कलम १०(१५) नुसार पूर्णपणे करमुक्त आहे.

*१०. विमा पॉलिसी मुदतपूर्तीची रक्कम :* काही अटींसह विमापॉलिसीच्या मुदतपूर्तीची रक्कम कलम १०(१०/D) नुसार पूर्णपणे तर १ एप्रिल २०१२ नंतर विमोचन होणाऱ्या पॉलिसीची देय रक्कम एक लाख असेल तर त्या रकमेवर १% कर कापून उरलेली रक्कम करमुक्त आहे.

‘मृत्यू आणि कर आपण टाळू शकत नाही’ अशा आशयाचे एक वचन आहे, असे असले तरी आयकर अधिनियम १० नुसार वरील दहा गोष्टी त्याला अपवाद आहेत.

© उदय पिंगळे

SHARE THIS

->"विविध मार्गांनी मिळू शकणारे करमुक्त उत्पन्न Tax Free Income"

Search engine name