माचीस आगकाडी उद्योग माहिती How to Make Matchsticks


🔥 माचीस आगकाडी उद्योग माहिती


आगकाड्या : कोणत्याही खरखरीत पृष्ठावर किंवा विशिष्ट प्रकारच्या पृष्ठावर घासल्यास पेट घेईल असे रासायनिक पदार्थांचे मिश्रण ज्या काडीच्या किंवा कागदी पट्ट्याच्या अथवा सुरळीच्या टोकास लाविलेले असते, तिला ‘आगकाडी’ असे म्हणतात.

👉लाकडावर लाकूड घासले गेल्याने वणवा लागतो असे आढळल्यावरून प्राचीन काळी यज्ञाकरिता अग्नी उत्पन्न करण्याचे अरणी-घुसळदांडू हे उपकरण प्रचारात आले असावे. गारगोटी आणि लोखंड यांच्या घर्षणाने ठिणगी पाडण्याची युक्ती म्हणजेच चकमक त्यानंतर माहीत झाली. या ठिणग्यांनी प्रथम कापूस पेटवीत. त्यानंतर कापसाऐवजी गंधकात बुडविलेल्या काड्या वापरात आल्या.

👉रासायनिक विक्रियेने विस्तव उत्पन्न करण्याच्या प्रयत्नांना एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी चालना मिळाली. पोटॅशियम क्लोरेट, साखर व डिंक यांचे मिश्रण लावलेल्या काड्या सल्फ्यूरिक अम्लात बुडविल्याने पेट घेतात, असे दिसून आल्यावर ‘तत्काळ अग्नी’ (इन्स्टंटेनियस-लाइट) या नावाची आगकाडी प्रचारात आली. तथापि ती वापरणे धोक्याचे आणि गैरसोयीचे असल्यामुळे लवकरच मागे पडली.

👉रासायनिक द्रव्यांच्या घर्षणाने पेटेल अशी आगकाडी १८२७ मध्ये जॉन वॉकर (इंग्लंड) यांनी बनविली. अँटिमनी सल्फाइड, पोटॅशियम क्लोरेट, डिंक किंवा स्टार्च यांच्या मिश्रणाचे गुल या काडीच्या टोकाला लाविलेले असे. काचेची पूड लावलेल्या किंवा दुसऱ्या कोणत्याही खरखरीत पृष्ठावर ते घासले की पेट घेई. परंतु अशी काडी ओढल्यावर इतस्तत: ठिणग्या उडत आणि अपायकारक व दुर्गंधी धूर होत असे त्यामुळे ती लोकप्रिय झाली नाही.

👉वरील मिश्रणातील अँटिमनी सल्फाइडा ऐवजी पांढरा फॉस्फरस वापरून बनविलेल्या ‘ल्युसिफर’ आगकाड्या १८३१ मध्ये निघाल्या. परंतु पांढऱ्या फॉस्फरसाच्या संपर्कामुळे आगकाड्यांच्या कारखान्यातील कामगारांना ‘फॉसीजॉ’ नावाचा जबड्यांच्या हाडाचा रोग होतो, असे जेव्हा दिसून आले तेव्हा त्यांचे उत्पादन कायद्याने बंद करण्यात आले. अँटोन फोन श्रोट्टे यांनी १८४५ मध्ये तांबड्या फॉस्फरसाचा शोध लावला. हा बिनविषारी असून सहजासहजी पेटत नाही त्यामुळे त्याचा उपयोग आगकाड्यांकरिता करणे शक्य झाले.

👉स्वीडनमध्ये लुंडस्ट्रॉम यांनी १८५५ मध्ये प्रथम सुरक्षित आगकाडी बनविली. ही काडी कोणत्याही खरखरीत पृष्ठावर घासून पेटविता येत नाही ती पेटविण्याकरिता विशिष्ट रासायनिक मिश्रण लावलेला पृष्ठभाग लागतो. हिचे दुसरे वैशिष्ट्य हे की, तिच्यामध्ये घर्षणजन्य उष्णतेने पेट घेणारे द्रव्य (तांबडा फॉस्फरस) आणि अँटिमनी सल्फाइड व खरखरीतपणा आणणारा एखादा पदार्थ यांचे मिश्रण आगपेटीच्या अरुंद बाजूच्या पृष्ठाला लावलेले असते आणि त्या योगाने प्रज्वलित होणारी द्रव्ये काडीच्या गुलात असतात. 

या विभागणीमुळे या आगकाड्या पूर्वीच्या काड्यांपेक्षा जास्त सुरक्षित ठरतात. गुलामध्ये पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशिम डायक्रोमेट, मँगॅनीज डाय-ऑक्साइड, गंधक, काचेची बारीक पूड, सरस इ. द्रव्ये असतात. यांतील पहिली तीन द्रव्ये ज्वलनास आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवितात व त्यामुळे प्रथम गंधक जळू लागतो. कारण काडीच्या लाकडापेक्षा तो अधिक सुलभतेने पेटतो.
त्यानंतर काडी पेट घेते. आगकाडीकरिता वापरावयाच्या काड्या अमोनियम फॉस्फेट किंवा बोरिक अम्ल यांच्या विद्रावात बुडवून नंतर सुकवितात त्यामुळे काडीची ज्योत विझविल्यावर लाकूड जळत राहत नाही. काडीच्या एका टोकाला सु. १० मिमी. लांबीपर्यंत पॅराफीन मेणाचा पातळ थर देतात व नंतर ते टोक गुल बनविण्याच्या मिश्रणात बुडवून काढतात. पॅराफिनामुळे काडीचे ज्वलन सुलभ होते. सेव्हने व काहेन यांनी १८९८ मध्ये फॉस्फरस सेस्क्विसल्फाइड वापरून घर्षक काड्या तयार

👉बहुतेक सर्व देशांत आगकाड्यांचा पुरवठा पातळ लाकडी पेट्यांतून केला जातो. 

पेटीचे दोन भाग असतात : 
(१) आतील खण व (२) खणाच्या चार बाजू झाकील असे पातळ लाकडी झाकण – त्यात हा खण सरकवून बसविता येतो. झाकणाच्या दोन बाजूंना घर्षक मिश्रण लावलेले असते. काही देशांत आगकाड्या कागदाच्या केलेल्या असून त्या पुठ्ठ्याच्या पुस्तकासारख्या वेष्टनात ठेवलेल्या असतात.

आगकाड्यांचे व आगपेट्यांचे इतरही अनेक प्रकार आढळतात. आगकाड्या बनविण्याच्या बहुतेक सर्व कृती यंत्राने केल्या जातात.

🥌कच्चा माल 🥌
👉 आगकाड्या तयार करण्यासाठी विशेष प्रकारचे लाकूड व कागद, खळ अथवा डिंक आणि आवश्यक ती रसायने यांची गरज असते.

🌲🌳लाकूड🌲
👉 हलके, मऊ व सच्छिद्र, गाठी किंवा तडे नसलेले, रचनेत सरळ व ज्याचे पातळ तक्ते निघतील असे लाकूड काड्यांकरिता लागते. काडी ओढताना ती मोडू नये इतपत कठीणपणा त्यास असावा लागतो. खण व झाकण यांकरिता लागणारे लाकूड नितळ पृष्ठाचे लागते. 

अशा लाकडामुळे घर्षकाचा लेप सर्वत्र सारखा देता येतो व कागद चांगला चिकटतो. काड्या व पेट्या यांसाठी ॲस्पेन, टिलिया जॅपोनिका, सिमनॉक, कॉटनवुड, बालसम, पॉपलर, पोप्रावुड व सावर या झाडांचे लाकूड सामान्यत: वापरतात. भारतात उपलब्ध असणारे मलबार ॲस्पेन, अशोक इ. लाकडांचे प्रकार काड्या व पेट्या यांसाठी उपयोगी ठरले आहेत.

🧪रसायने व इतर पदार्थ : 👉गंधक, पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशियम डायक्रोमेट, मँगॅनीज डाय-ऑक्साइड, आयर्न ऑक्साइड, अँटिमनी सल्फाइड, तांबडा फॉस्फरस, डिंक, सरस इत्यादींचा उपयोग आगकाडीच्या निर्मितीत केला जातो.

 📖कागद📃
👉३०, ३२, ३४ व ५४ मिमी. रुंदीचा, निळ्या रंगाचा व पातळ कागद खण व झाकण यांवर चिकटविण्यासाठी वापरतात. कागद हलका पण चिवट असावा लागतो. लेबलासाठी कॅनरी पिवळा किंवा पांढरा कागद सामान्यत: वापरतात.

🌁उत्पादन
👉अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इंग्लंड, रशिया, स्वीडन, इटली, फिनलंड, जपान इ. देशांत आगकाड्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. 

👉आगकाड्यांचे दोन प्रकार आहेत : 
(१) आगपेटीच्या झाकणाच्या पृष्ठावर ओढल्याने पेटणाऱ्या व (२) कोणत्याही पृष्ठावर ओढून पेटणाऱ्या. 

यांपैकी पहिला प्रकारच हल्ली सर्रास वापरात आहे. दुसरा प्रकार क्वचितच बनविला जातो.

👉 पहिल्या प्रकारच्या आगकाडीच्या गुलात पोटॅशियम क्लोरेट व फॉस्फरस सेस्क्विसल्फाइड हा ज्वलनशील पदार्थ मुख्यत: वापरतात.

👉आगकाड्यांच्या उत्पादनास सुरुवात लाकडांच्या ओंडक्यांपासून होते. ओंडके यांत्रिक करवतीने कापून ठराविक लांबीचे तुकडे करतात व या तुकड्यांवरील साल हातांनी वेगळी काढतात. नंतर यंत्राने त्या तुकड्यांचे पातळ तक्ते काढतात व त्यांचे झाकणाच्या आकाराचे व खणाच्या चौकटीकरिता व तळाकरिता लागणारे तुकडे काढतात (आ. १). या वेळीच त्यांना घड्या पाडणे सोयीचे व्हावे, यासाठी त्यांवर यंत्राने खुणा केल्या जातात.

👉 यंत्रामध्ये एका वेळी एकच झाकण तयार होते. खुणा केलेल्या जागी तक्ते दुमडून त्यांस एका बाजूस खळ लावून तयार केलेली कागदाची पट्टी यंत्राने किंवा हाताने चिकटवितात. खण यंत्राने किंवा हाताने बनवितात. प्रथम तळ कागदाला चिकटवितात व नंतर यंत्राच्या साहाय्याने चौकट तयार करून ती तळाला जोडतात. तयार केलेली झाकणे व खण वाफेने गरम केलेल्या खोलीत ठेवून वाळवितात.

👉काड्यांसाठी प्रथम लाकडाचे २ मिमी. जाडीचे तक्ते घेतात व त्यांचे यंत्राच्या साहाय्याने काड्यांत रूपांतर करतात. लाकूड रंगीत असेल तर ते प्रथम रंगहीन करावे लागते. या काड्या अमोनियम फॉस्फेटाच्या विद्रावात भिजवितात व उष्ण हवेच्या झोताने वाळविल्यावर फिरत्या पिपाच्या योगाने त्यांना चकाकी आणतात. त्यानंतर त्यांतील मोडक्या निरुपयोगी काड्या चाळणीने काढून टाकल्यावर त्या काड्या एका चौकटीत ओळीने रचतात. अनेक ओळी असलेल्या तबकांमधील काड्यांची टोके यंत्राच्या साहाय्याने प्रथम वितळलेल्या उष्ण पॅराफीन मेणात व नंतर गुलाच्या रसायनांच्या पातळसर मिश्रणात बुडवितात. नंतर काड्या वाळवून त्या यंत्राने खणात भरतात. त्यानंतर खण झाकणात बसवितात वा त्यावर आवश्यकतेनुसार अवकारी पट्टी व उत्पादक कारखान्याचे बोधचिन्हांकित लेबल चिकटवितात. अखेरीस झाकणाच्या दोन अरुंद बाजूंवर घर्षक मिश्रणाचा लेप देऊन तो वाळवितात आणि १२ पेट्यांचा एक गट करुन असे गट लाकडी अगर कागदी जलाभेद्य खोक्यांतून अगर वेष्टनांतून भरतात. काही ठिकाणी कागदाच्या भरीव सुरळ्यां-पासून केलेल्या काड्या वरील प्रक्रिया करून लाकडी काड्यांप्रमाणेच खणांत भरून पुरवितात.

👉पुस्तकासारख्या वेष्टनातील कागदी काड्या तयार करण्याकरिता पुरेशा जाड कागदाच्या पट्ट्या घेऊन यंत्राने काडीच्या रुंदीइतक्या अंतरावर त्यांच्या फाकळ्या करून लांबच लांब फण्या तयार करतात. आवश्यक त्या द्रव्यांचा समावेश या पट्ट्यांमध्ये अगोदरच करून घेतलेला असतो. या फण्या प्रथम पॅराफीन मेणात व तदनंतर गुलाच्या मिश्रणात बुडवून व वाळवून त्यांचे दहा दहा काड्यांचा एक असे विभाग कापून ते छापील कागदी वेष्टनांत बसवितात. वेष्टनावर थोड्या भागावर घर्षक लेप वाळविला म्हणजे कृती पूर्ण होते.

 🎡विशेष प्रकारच्या आगकाड्या 🎡
 👉दुसऱ्या महायुद्धात जलाभेद्य काड्यांचे उत्पादन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत करण्यात आले. या प्रकारच्या काड्या लष्करी वापरासाठीच बनवितात. यांचे गुल नेहमीच्या काडीसारखेच असते पण त्यावर जलाभेद्य आवरण असल्यामुळे ह्या आर्द्र हवेत व पाण्याने भिजल्या तरीही वापरता येतात. ‘विंड फ्लेमर’ व ‘फ्युझी’ ह्या दोन विशिष्ट काड्यांचा वापरही फक्त लष्करापुरता मर्यादित आहे. विंड फ्लेमर काड्या सोसाट्याच्या वाऱ्यातही वापरता येतात. ह्या काड्यांच्या गुलाचे घटक स्फोटक असतात. गुल लांबपर्यंत असून ते एकदा पेटल्यावर मोठा वारा आला तरी ते संपेपर्यंत काडी विझत नाही. ह्या आगकाड्या कोणत्याही पृष्ठावर ओढता येणाऱ्या व फक्त झाकणाच्या पृष्ठावर ओढता येणाऱ्या अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहेत. फ्युझी काड्या पेटविल्याने ज्योत मिळत नाही व फारसा प्रकाशही पडत नाही. परंतु निर्माण झालेली उष्णता दिव्याची वात, सिगारेट इ. पेटविण्यास पुरेशी असते.

👉यांशिवाय रंगीत ज्योती मिळाव्या म्हणून गुलामध्ये विशिष्ट रसायने वापरलेल्या आगकाड्याही उपलब्ध आहेत. या काड्यांना ‘बेंगॉल लाइट’ असे म्हणतात [ शोभेचे दारूकाम].

💒भारतीय उद्योगधंदा 🗽
👉भारतातील आगकाडीचा उद्योग हा प्रामुख्याने विसाव्या शतकातील आहे. १८९५ मध्ये अहमदाबाद येथे गुजरात इस्लाम मॅच फॅक्टरी हा पहिला आगकाड्यांचा कारखाना सुरू झाला. १९००–१९१० या काळात बंगालमध्ये अनेक लहान लहान कारखाने निघाले. ह्या कारखान्यांत हातांनी किंवा शक्तीवर चालणारी यंत्रे वापरीत. ह्या वेळचे भारतीय उत्पादन निकृष्ट प्रतीचे असल्यामुळे ते लोकप्रिय नव्हते व भारताची गरज स्वीडन, जपान आदी देशांतून आयात करून भागविली जात असे.

👉पहिल्या महायुद्धकाळात स्वीडनहून येणारा माल बंद झाला. १९२२ मध्ये सरकारने आयात मालावर जकात बसविली. त्यामुळे देशी कारखान्यांना उत्तेजन मिळाले. यंत्राने पेट्या व काड्या तयार करणारे काही कारखाने बंगालमध्ये निघाले. त्यांचे उत्पादन मोठे असल्यामुळे त्यांना पुरून उरणाऱ्या कोऱ्या पेट्या व गुल लावण्याच्या काड्या कुटीरोद्योगासाठी देण्यात येत. तसेच काही ठिकाणी पेट्या हातांनीच बनवीत. सत्तुर (तमिळनाडू) येथे १९२५ मध्ये पेट्या बनविण्याचा कुटीरोद्योग सुरू झाला. त्यानंतर शिवकाशी व कोविलपट्टी (तमिळनाडू) येथेही कुटीरोद्योग म्हणून उत्पादन सुरू झाले. यामुळे तेथील लोकांना फावल्या वेळात काम मिळू लागले.

👉सुरुवातीला पेट्या व काड्या यांकरिता लागणाऱ्या कापीव लाकडी फळ्या इ. स्वीडन, जपान आदी देशांतून आयात करीत. १९२४ मध्ये सरकारने या आयात मालावर जकात बसविली. यामुळे अनघड लाकडाचीच तेवढी आयात करण्यात येऊ लागली. अहमदाबादच्या कारखान्याशिवाय इतरत्र काडीला गुल लावणे व पेट्या भरणे ह्या क्रिया हातांनीच केल्या जात. नंतर यांसाठी लागणारी स्वयंचलित यंत्रे जपान, स्वीडन व जर्मनीहून आणण्यात आली.

♨️भारतीय आगकाडी
👉धंद्याच्या दृष्टीने १९२२–१९२६ हा काल उन्नतीचा काल होता. या काळात कलकत्ता, लाहोर, बरेली येथे कारखाने निघाले. तसेच स्वीडिश कंपनीने (विम्को –वेस्टर्न इंडिया मॅच कंपनी लि.) अंबरनाथ, कलकत्ता, मद्रास, बरेली व धुब्री येथे कारखाने काढले. १९२६–२७ साली १·३५ कोटी ग्रोस पेट्या तयार झाल्या व त्यामुळे १९१६–१७ मध्ये १·८३ कोटी इतकी झालेली आयात १९२६–२७ मध्ये ६१·३ लक्ष ग्रोस पेट्या इतकी खाली आली. इंडियन टॅरिफ बोर्डाने धंद्याच्या वाढीसाठी आयात मालावर जकात बसवावी अशी सूचना केली.

👉कुटीरोद्योगाने बनविलेल्या आगकाड्यांचा दर्जा कमी असल्याने त्यांना यंत्रोत्पादित मालाशी स्पर्धा करणे कठीण झाले. मालाच्या किंमती घसरल्या व कुटीरोद्योगावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. आयात मालावरील जकातीचे उत्पन्न कमी येऊ लागल्याने तूट भरून काढण्यासाठी देशी मालावर अबकारी कर बसविण्यात आला व कुटीरोद्योगाला अबकारी करात सूट देण्यात आली. तसेच प्रत्येकी ८० काड्यांपेक्षा जास्त काड्या असलेल्या पेट्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली. १९४१ मध्ये अस्तित्वात असलेल्या कारखान्यांची वर्गवारी त्यांच्या उत्पादनशक्तीवरून तीन वर्गांत करण्यात आली आहे. प्रतिवर्षी प्रत्येकी ६० काड्यांच्या पाच लक्ष ग्रोस वा त्याहून अधिक पेट्या तयार करणारे कारखाने ‘अ’ वर्गात, वर्षाला पाच लक्ष ग्रोस पेट्यांहून कमी उत्पादन करणारे कारखाने ‘ब’ वर्गात व बाकीचे म्हणजे कुटीरोद्योगातील कारखाने ‘क’ वर्गात (दिवसास १०० ग्रोसापर्यंत उत्पादन) अशी वर्गवारी करण्यात आली. दिवसाला २५ ग्रोसांहून कमी उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचा ‘ड’ हा नवा वर्ग १९५४ मध्ये करण्यात आला.

👉या धंद्यासाठी लागणारे  ॲस्पेनाचे लाकूड भारतात उपलब्ध नाही. त्याऐवजी भारतात पांढरी पल्ली, सातवीण, शिरीष, भिलवा, धूप, मलबार ॲस्पेन, काकड, अशोक, सेमूळ (सावर) इ. झाडांचे लाकूड वापरतात. गंधक व तांबडा फॉस्फरस ही रसायने आयात करावी लागतात, पण इतर रसायनांचे उत्पादन भारतात होते.

👉गुजरात इस्लाम मॅच फॅक्टरी (अहमदाबाद), इसवी मॅच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (कलकत्ता), बरेली मॅच वर्क्स (बरेली), आसाम मॅच कंपनी (धुब्री) आणि वेस्टर्न इंडिया मॅच कंपनी लि. (अंबरनाथ, मद्रास, कलकत्ता, बरेली) हे भारतातील प्रमुख कारखाने होत. 

१९६०–६१ साली या कारखान्यांचे एकूण उत्पादन ४·५३ कोटी ग्रोस पेट्या (१ पेटी = ६० नग) आणि १९६२–६३ साली ४·९०६७ कोटी ग्रोस पेट्या होते.

✍सुनिलकुमार भामंद्रे 

🎯 व्यवसाय साक्षर व्हा.....

🎯 उद्योजक बना.....

SHARE THIS

->"माचीस आगकाडी उद्योग माहिती How to Make Matchsticks"

Search engine name