पाईपलाईन / पाटाचे हक्क.

शेती विषयक माहिती » पाईपलाईन / पाटाचे हक्क.

जमीन बागायत करण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत असतात. शक्य असेल तेथून पाईप लाईन टाकून जमीन बागायत करण्याकडे शेतकर्‍याचा कल असतो. पाईपलाईनमुळे आता लांबच्या ठिकाणावरुन पाणी आणणे शक्य झाले आहे. अशा वेळी दुसर्‍या शेतकर्‍यांच्या शेतातून पाईपलाईन आणावी लागते व त्यामुळेदेखील शेतकर्‍यांमध्ये वाद होतांना आपण पाहतो.

पूर्वीच्या काळी बहुसंख्य शेतकर्‍यांचे पाण्याचे पाट हे विहीरीपासुन प्रत्यक्ष शेतापर्यंत, मुख्यत: स्वत:च्या शेतातून जात असत. पाणी पुरवठयाच्या मर्यादित साधनांमुळे, पाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे व शेतजमीनीचे तुकडे झाल्यामुळे आता दुसर्‍याच्या शेतातूनदेखील पाण्याचे पाट काढावे लागतात. या संदर्भात जमीन महसूल कायद्यात असलेल्या तरतुदीचा आपण अभ्यास करणार आहोत.

जर शेतकर्‍यांमध्ये सामंजस्य असेल आणि पाट काढण्यास किंवा पाईपलाईन काढण्यास कोणाचीही हरकत नसेल तर वाद निर्माण होत नाहीत व अशा प्रकरणी कोणत्याही परवानगीचा देखील प्रश्न उद्भवत नाही. तथापी दुसरा शेतकरी पाण्याचा पाट काढू देत नसेल किंवा पाईपलाईन जाऊ देत नसेल तर वाद निर्माण होऊ शकतो.

कायदेशीर तरतुद :
या संदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याअंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल (पाण्याचे पाट बांधणे) नियम 1967 हे बनविण्यांत आले आहेत. या नियमानुसार ज्या शेतकर्‍याला दुसर्‍याच्या जमीनीतून जाणारे आपल्या शेतापर्यंतचे पाट बांधण्याची इच्छा असेल त्याने विहीत नमुन्यामध्ये तहसिलदाराकडे अर्ज केला पाहिजे. असा अर्ज मिळाल्यानंतर तहसिलदार सर्व संबंधितांना नोटीस काढून त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देतात. कोणत्या मुद्यावर शेजारच्या शेतकर्‍याची हरकत आहे हे तपासले जाते व गरज विचारात घेऊन अर्जदाराला पाण्याचे पाट बांधण्याची परवानगी दिली जाते. अशी परवानगी देतांना तहसिलदाराकडून खालील महत्वाचे मुद्दे विचारात घेतले जातात.
1. शक्यतो परस्परांना संमत होईल अशा दिशेने पाट काढण्यास परवानगी दिली जाते.
2. एकवाक्यता न झाल्यास शेजारच्या शेतकर्‍याचे कमीतकमी नुकसान होईल अशा पध्दतीने पाट काढण्यास परवानगी दिली जाते.
3. असे पाट किंवा पाईपलाईन ही जवळच्या अंतराने टाकली गेली पाहिजे.
4. पाट काढतांना किंवा पाईपलाईन टाकतांना दुसर्‍या शेतकर्‍याचे जाणीवपुर्वक नुकसान केले जात नाही ना याची खात्री केली जाते.
5. पाण्याच्या पाटाची रुंदी ही किमान आवश्यक एवढीच असेल व कोणत्याही बाबतीत दिड मिटरपेक्षा जास्त असू नये.
6. पाईप लाईन किमान अर्ध्या मिटरपेक्षा जास्त खोलीवर टाकली गेली पाहिजे.
7. जमीनीवरुन करण्यांत येणारे पाण्याचे पाट व जमीनीवरुन जर पाईपलाईन टकण्यांत आली तर शेजारच्या शेतकर्‍यास वाजवी म्हणून ठरविण्यांत येईल ते भाडे दिले जाते.
8. पाईपलाईन टाकतांना तसेच तिची दुरुस्ती करतांना कमीतकमी जमीन खोदली जाईल व खोदलेली जमीन अर्जदाराने पुन्हा स्वखर्चाने पुर्ववत केली पाहिजे.
9. उभी पिके असतील तर त्यांना कमीतकमी नुकसान पोहोचेल याची दक्षता घेतली जाते. एवढे करुनही नुकसान झाल्यास तिची नुकसान भरपाई अर्जदाराने देणे अपेक्षित आहे.
10. अशी नुकसान भरपाई देण्यात जर कसूर करण्यांत आली तर ती जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करता येईल.

अपील :
पाईपलाईनबाबत किंवा पाण्याच्या पाटाबाबत तहसिलदारानी दिलेल्या आदेशाविरुध्द अपील करता येत नाही. लहानलहान वाद हे स्थानिक पातळीवर सुटावेत व अपीलाच्याद्बारे संबंधिताला पाईपलाईनसारखी महत्वाची बाब लांबविण्याची संधी मिळू नये हा यामागील उद्देश आहे. तथापी अन्यायाने आपल्यावर आदेश बजावण्यांत आले आहेत असे वाटल्यास जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागता येईल व जिल्हाधिकारी अशा प्रकरणाची कागदपत्रे मागवून व सुनावणी घेऊन योग्य ते आदेश काढू शकतील.

अर्जाचा नमुना :
शेतकर्‍याने खालील विहीत नमुन्यात तहसिलदाराकडे अर्ज केला पाहिजे व अर्जासोबत पाईपलाईनचा नकाशा व 7/12 चा उतारा जोडला पाहिजे.

नमुना
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 याचे कलम 49, पोट-कलम (1) अन्वये पाण्याचा पाट बांधण्यासाठी तहसीलदाराकडे करावयाचा अर्ज

तहसीलदार, . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . यांस,

अर्जदाराचे नांव . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
वय . . . . . . . . . . . ., व्यवसाय . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
राहण्याचे ठिकाण . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

शेजारच्या जमीन धारकाचे नांव . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
वय . . . . . . . . . . . ., व्यवसाय . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
राहण्याचे ठिकाण . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

मी खालील जमीनीचा धारक आहे :-
गावाचे नांव
भूमापन क्रमां
कपोट-हिस्सा क्रमां
कक्षेत्रफळ
आकारणी
जमीन मालकाचे नांव
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)




रु. पैसे

वर उल्लेखिलेल्या माझ्या जमीनीच्या जलसिंचनासाठी पाण्याच्या पुढील साधनातून पाणी घेण्याचा मला हक्क आहे :-
(येथे पाण्याच्या साधनाचा तपशील द्यावा)
हे पाणी घेण्यासाठी, शेजारचे जमीनधारक असणारे .. .. .. .. यांच्या ताब्यातील किंवा .. .. .. .. यांच्या मालकीच्या पुढील जमीनीमधून पाण्याचा पाट बांधणे आवश्यक आहे.
गावाचे नांव
भूमापन क्रमां
कपोट-हिस्सा क्रमां
कक्षेत्रफळ
आकारणी
जमीन मालकाचे नांव
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)




रु. पैसे

माझ्या जमीनीचा शेतीसाठी पूर्णपणे आणि कार्यक्षमरितीने उपयोग करण्यासाठी पाण्याचा पाट बांधणे आवश्यक आहे.

जमीनीसंबंधीचे अधिकार अभिलेखातील उतारे जोडले आहेत. म्हणून, मी विनंती करतो की, उक्त जमीनीमधून पाण्याचा पाट बांधण्यासाठी मला परवानगी देण्याबद्दल शेजारच्या जमीनधारकास निदेश देण्यांत यावा.
आपला,
दिनांक . . . . . . . . अर्जदाराची सही.

टीप : नदीच्या पात्राचा भाग असणार्‍या जमीनीच्या बाबतीत अधिकार अभिलेखातील उतारे जोडण्याची आवश्यकता असणार नाही.

हे लक्षात ठेवा :
1. अस्तित्वात असलेले पाण्याचे पाट कोणी मोडून टाकल्यास किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यास किंवा त्यास नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधीत शेतकर्‍याने तहसिलदाराकडे दाद मागितली पाहिजे.
2. मामलेदार कोर्ट ऍक्टनुसार सुध्दा असा अडथळा आणण्यास मनाई केली जाऊ शकते.
3. जमीन महसूल कायद्यानुसार कलम 49(10) नुसार अशा प्रत्येक नुकसानीच्या प्रसंगाबाबत प्रत्येकवेळी शंभर रुपयाहून अधिक नसेल एवढा दंड संबंधितांना केला जाऊ शकतो.


SHARE THIS

->" पाईपलाईन / पाटाचे हक्क."

Search engine name