उद्योगज्ञान मैत्रीत भागीदारी Partnership


उद्योगज्ञान मैत्रीत भागीदारी : समज-गैरसमज :-माझ्या असं वाचनात आलं होतं की, ज्याबरोबर व्यवसाय करतो त्याच्याशी मैत्री करू नये किंवा मित्रांबरोबर व्यवसाय करू नये. असं का? व्यवसाय अशा लोकांबरोबर केला जातो, किंबहुना होतो ज्यांची मतं जुळतात. मग ती वस्तूंच्या, सेवेच्या बाबतीत असो किंवा किमतीच्या. माझे व्यवसायातील मित्र मान्य करतील की, आपला दिवसातील जास्त वेळ हा अशा लोकांच्या सान्निध्यात जातो जे आपल्या व्यवसायाशी संलग्न आहेत. ते आपले असोशिएट्स, कंत्राटदार, ग्राहक असतात. काही कालावधीनंतर या लोकांबरोबर वेळोवेळी संपर्क आल्यामुळे याच व्यक्ती आपल्या आयुष्याचा हिस्सा बनतात आणि आपण त्यांना चारचौघात हक्काने माझा मित्र अशी ओळख करून देतो. मग असं का? की जे आपले शाळा-कॉलेजपासूनचे, सोसायटीमधले आपले मित्र यांच्याबरोबर व्यवसाय करताना असं म्हटलं जातं की, राहू दे याच्याबरोबर मैत्री बरी, व्यवसायामुळे आमच्यात वाईटपणा नको. मग नक्की वाईट कोण? व्यवसाय, व्यवसाययिक, की मित्र? वाईट आहे तो ‘समज’ जो सांगतो की, मैत्रीमध्ये व्यवहार न आणलेलाच बरा! असं बर्‍याचदा पाहिलं गेलंय की, उद्योजक हा थोडा ‘एकटा’ असतो. नोकरी करणार्‍याचे बरेच कार्यालयीन मित्रमंडळी असतात, ज्यांच्या बरोबरीने तो प्रवास, जेवण, पार्ट्या यांचा आनंद घेतो. याचबरोबरीने त्याचे पूर्वीचे मित्र जे आता त्याच्यासारखीच नोकरी करत आहेत, तेसुद्धा या-ना त्या कारणाने संपर्कात असतात; पण आपला उद्योजक मित्र वेगळा मार्ग अवलंबतो, व्यवसायातील सुरुवातीची धावपळ, आव्हाने स्वीकारत असतानाच्या काळात त्याचे मित्र दूर होत जातात, संपर्क न राहिल्यामुळे किंवा गप्पांचे विषय बदलल्यामुळे उद्योजक त्याच्या जुन्या मित्रांपासून दूर होतो – ‘एकटा’ होतो. यातपण जर एखादा मित्र व्यवसाय करू लागला तर असं म्हटलं जातं, आधीच आपल्यात अंतर आहे आणि व्यवहार कसा जमेल काय माहीत? मित्राबरोबर व्यवसाय करण्यात नक्कीच काही चांगले, काही वाईट अनुभव आहेत; पण काही पुढे दिलेल्या गोष्टींवर लक्ष दिल्यास मित्राबरोबरचे व्यवहारसंबंध किंवा भागीदारी पद्धतशीरपणे केली जाऊ शकते. 

संवाद : प्रत्येक चांगल्या नातेसंबंधांची सुरुवात आणि त्या नात्याचे आयुष्य, दोन व्यक्तींमधील होणारा संवाद ठरवतो. आधीपासूनची ओळख, मैत्री आणि विश्वास असल्यामुळे, एकत्र व्यवसाय करणे ही एक आनंददायी गोष्ट होऊ शकते. यात आधी मित्र असतानाचे विषय, गप्पा वेगळ्या होत्या, पण आता व्यवसाय करतानाचे गांभीर्य आणि वेळेचे, पैशाचे गणित यावर वेळोवेळी चर्चा केल्यास परिणाम चांगले येण्याची खात्री आहे. 

सर्व काही लिखित स्वरूपात : अनेकदा आपल्या भावनांवर अवलंबून व्यवहार केला जातो, जी व्यवसाय करण्याची चुकीची पद्धत आहे. नातेसंबंध कितीही बळकट असले तरीही जेव्हा विषय व्यवहाराचा येतो तेव्हा बोललेल्या आणि ठरवलेल्या गोष्टी लिखित स्वरूपात करून घेणे महत्त्वाचे आहे. लिखित स्वरूपातील गोष्टी व्यवहार करणार्‍यांना ठरलेल्या गोष्टींशी बांधील ठेवतो आणि दीर्घकालीन व्यावहारिक संबंधासाठी त्याचा फायदा होतो. 

अपेक्षा आणि ध्येय : व्यवसायामध्ये पूर्णपणे पारदर्शकता आणण्यासाठी आपली यातून अपेक्षा काय आहे हे सुरुवातीलाच मांडणे महत्त्वाचे आहे. मैत्री कितीही घट्ट असली तरीही दोन मित्रांची जीवनशैली, आयुष्याकडे बघायची पद्धत वेगळीच असणार, याचा एकमेकांकडून मान राखला जाणे गरजेचे आहे. व्यवसाय करतानाची अपेक्षा स्पष्टपणे मांडली जाणे गरजेचे आहे, कारण अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात, पण ध्येय एक असणे अपेक्षित आहे. या एक ठरलेल्या ध्येयाला अनुसरून काम केल्यास गोष्टी ठरवल्याप्रमाणे साकार होऊ शकतात. 

पैसा हा कधी भांडणाचे कारण होऊ नये : कुठल्या कारणामुळे भांडणाची सुरुवात झाली याचे बर्‍याचदा उत्तर हे – ‘पैसा’ म्हणून येते. जर पैसा हेच भांडणाचे कारण असू शकणार असेल तर त्यासाठी सर्वात आधी उपाययोजना केली गेली पाहिजे. जसे की पैशाचे व्यवहार हिशेबनीसाने तपासणे आणि नोंद ठेवणे. व्यवहारामध्ये किती गुंतवणूक गरजेची आहे, किती दिवसांनी आणि किती नफा अपेक्षित आहे, तो नफा कसा विभागला जाणार यावर आधीच निर्णय घेतला गेल्यास, पैसा हे भांडणाचे कारण होण्यापासून टाळता येणे शक्य आहे. 

काम वेगळे आणि कुटुंबसंबंध वेगळे : मैत्रीमुळे जरी आपण व्यवसायात एकत्र आलो असू, तरीही कौटुंबिक नातेसंबंध आपल्या कामापासून वेगळे ठेवणे फायदेशीर आहे. कौटुंबिक संबंध बिनशर्त प्रेम आणि स्वीकृती यावर आधारित आहेत. याउलट व्यवहार हा काही वेळा गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट असू शकतो. व्यवसाय हा सर्व कामगिरी व जबाबदारी यावर अवलंबून असल्यामुळे व्यवहार करणार्‍या दोन व्यक्ती त्या सांभाळून घेऊ शकतात, पण यामध्ये कुटुंबातील इतर मंडळी प्रत्येक वेळी कशा प्रतिक्रिया देतील याची खात्री देता येत नाही. ‘All lasting business is built on friendship: lfred Montapert 

एक गोष्ट व्यवसायातील इतक्या वर्षांच्या अनुभवातून शिकता येते की, असे मित्र जे विश्वासाचे, व्यवसायास पात्र, प्रगतिशील, प्रशंसा करणारे, संकटसमयी बरोबरीला उभे राहणारे आहेत अशा मित्रांबरोबर व्यवसाय नक्कीच केला जाऊ शकतो.


SHARE THIS

->"उद्योगज्ञान मैत्रीत भागीदारी Partnership"

Search engine name