आल्याच्या सुधारीत जाती व आले लागवडीच्या पद्धती


१) सुप्रभा : ही जात कुंडली स्थानिक या जातीमधून निवडली आहे. या जातीच्या झाडाला भरपूर फुटवे असतात. गड्डे जाड असतात आणि त्यांची टोके गोलाकार असतात. साल चमकदार करड्या रंगाची असते. तंतू ४.४%, सुगंधी तेल १.९% व ओली ओरेझीन ८.९% असते. हिरव्या आल्यासाठी व सुंठीसाठी ही योग्य जात आहे. प्रति हेक्टरी ३.४० टन उत्पादन मिळते.


२) सुरुची : ही जात कुंडली स्थानिक या जातीमधून निवडली आहे. गड्डे हिरवट पिवळ्या रंगाचे असतात. ओरेझीन १० % असते. प्रती हेक्टरी २.२७ टन उत्पादन मिळते.



3) सुरभी : स्थानिक जातीचे कंदावर 'एक्सरे' ची प्रक्रिया करून ही जात निवडलेली आहे. गड्ड्यांचा आकार सिलेंडर सारखा असतो. साला गर्द चमकदार असते. भरपूर फुटवे असतात. तंतू ४%, तेल २.१% असते. प्रति हेक्टरी उत्पादन ४ टन मिळते.



वरील सुधारीत जाती मिळण्याचा पत्ता : Director central Plantaiton Crops Research Institute, Post Kudly, Kasaragod (Kerala).



पुर्वमशागत : आल्यासाठी १ फुटापर्यंत खोल उभी व आडवी नांगरट करून १ ते २ कुळवाच्या पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी. स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा.


आल्याचे पीक जमिनीत १८ महिन्यापर्यंत राहू शकत असल्यामुळे आणि या पिकास लागणार्या  भुसभुशीत जमिनीमुळे जमीनीच चांगली पूर्व मशागत करणे गरजेचे आहे. शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे, तसेच जमीनतील बहुवार्षिक तणांचे कंद, काश्या वेचून गोळा कराव्यात. मोठे दगड - गोटे वेचून काढावेत. 


आले लागवडीच्या पद्धती : जमिनीच्या प्रकारानुसार तसेच स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार आले लागवडीची पद्धत वापरावी. या पिकाची लागवड प्रामुख्याने सपाट वाफे, सारी वरंबा पद्धत आणि रुंद वरंबा किंवा गादी वाफ्यावर केली जाते.



१) सपाट वाफे पद्धत : पठारावरील सपाट जमिनीवरती जेथे पोयटा किंवा वाळू मिश्रीत जमीन आहे. अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करतात. त्यासाठी जमिनीच्या उतारानुसार २ x १ मी. किंवा २ x ३ मी. चे सपाट वाफे तयार करून घ्यावेत. सपाट वाफ्यामध्ये आल्याची लागवड २० x २० सें. मी. किंवा २२.५ x २२.५ सें. मी. अंतरावरती करावी की, जेणेकरून प्रति हेक्टरी रोपांची संख्या दोन लाखाच्या दरम्यान राहील.



२) सरी वरंबा पद्धत : मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करावी. या पध्दतीमध्ये लाकडी नांगराच्या सहाय्याने ४५ सें.मी. वरती सर्या  पाडून घ्याव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून २ इंच खोल आल्याची लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.


३) रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत : महाराष्ट्रामध्ये काळ्या जमिनीत किंवा आधुनिक सिंचन पद्धत जसे तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर केला जातो, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करणे फायदेशीर ठरते. वरील पद्धतीपेक्षा या पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २०% उत्पादन जास्तीचे मिळते. जमिनीच्या उतारानुसार रुंद वरंब्याची (गाडी वाफ्याची) लांबी ठेवावी. १३५ सें.मी. वरती सारी पाडून घ्यावी, म्हणजे मधील वरंबा ९० सें.मी. रुंदीचा होईल. दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ४५ सें.मी. सोडावी. या रुंद वरंब्याची उंची २० ते २५ सें.मी. ठेवून त्याच्यावरती २२.५ x २२.५ सें.मी. वरती लागवड करावी.


SHARE THIS

->"आल्याच्या सुधारीत जाती व आले लागवडीच्या पद्धती"

Search engine name