Business plan व्यवसायाचा आराखडानमस्कार उद्योजक मित्रांनो !
क्रिकेटच्या दोन आंतरराष्ट्रीय संघांमध्ये जर सामना होणार असेल तर सामन्यापूर्वी त्या संघाचा कप्तान व कोच मिळून आपल्याला हा सामना कसा जिंकता येईल याबाबत चर्चा करत असतील की नाही? काय वाटतं तुम्हाला? एखाद्या संघाचं सामना खेळण्यामागचं उद्दीष्ट काय असंतं? तो सामना जिंकावा हेच प्रत्येक संघाचं उद्दीष्ट असतं. सामन्याच्या आधी संघाचा कप्तान, कोच व इतर खेळाडू मिळून सामना जिंकण्यासाठीचा आराखडा म्हणजेच प्लॅन तयार करतात. ज्या संघाचं प्लॅनिंग जबरदस्त असते त्याच संघाला मैदानात योग्य रणनीतीच्या आधारावर सामना जिंकता येतो. याचाच अर्थ फक्त खेळ खेळता येणं हे सामना जिंकण्यासाठी पुरेसं नाही. सामना जिंकण्यासाठी प्लॅनिंग करता आलं पाहीजे. त्याचप्रमाणे व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करणे अत्यंत गरजेचे आहे.

व्यवसायाचा आराखडा हा व्यवसाय व्यवस्थापनेतील एक महत्त्वाचा घटक आहे. प्लॅनिंग दरम्यान व व्यवसायाचे भविष्याचे चित्र आधीपासुनच तयार केले जाते, व्यवसायातील ध्येय ठरवले जाते व ते साध्य करण्यासाठी योग्य - कृती आराखडा तयार केला जातो. व्यवसायाअंतर्गत प्लॅनिंग निरनिराळ्या पातळीवर व निरनिराळ्या स्वरुपात केले जाते. परंतु उद्देश हाच असतो की व्यवसायाचे ध्येय साध्य करणे.

व्यावसायिक आराखड्याचे प्रकारः

1. Strategic Planning: स्ट्रॅटेजिक प्लॅन हा संपुर्ण व्यवसायाला लक्षात घेऊन बनवला जातो. स्ट्रॅटेजिक प्लॅनमध्ये व्यवसायाची दूरगामी उद्दीष्टे ठरवली जातात व त्याला अनुसरुन वार्षिक ध्येय ठरवले जाते. त्याच प्रमाणे वार्षिक ध्येय साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या विविध विभागांना अनुसरुन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. व्यवसायामध्ये आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी प्राधान्यता ठरवल्या जातात. स्ट्रॅटेजिक प्लॅन कंपनीचे विभागप्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी मिळून बनवतात. व्यवसायची वार्षिक विक्री ध्येय, नफा प्राप्ती, उत्पादन क्षमता, मार्केटींग, ग्राहकसेवा, बजेटींग, भांडवल उभारणी, इत्यादी महत्त्वाच्या विभागांबद्दल आगामी वर्षाचे ध्येय व धोरणे ठरवली जातात.

उदाहरणार्थ: एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे वार्षिक ध्येय रु. ५० कोटी एवढे ठरवण्यात आले असेल तर ते साध्य करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये काय महत्त्वाचा बदल करावा लागेल मार्केटिंगसाठी काय नविन करावे लागेल? आवश्यक मनुष्यबळ किती लागेल? भांडवल उभारणी कशी व कधी करावी लागेल इत्यादी बाबतचे महत्त्वाचे निर्णय स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग दरम्यान घेण्यात येतात. या प्लॅनला संलग्न असा प्रत्येक विभागासाठी वेगळा प्लॅन बनवावा लागतो तो म्हणजे Tactical Plan.

2. Tactical Plan: स्ट्रॅटेजिक प्लॅन साध्य करण्यासाठी व्यवसायातील विशिष्ट विभागाद्वारे Tactical Plan तयार करण्यात येतो. व्यवसायाच्या विभागांअंतर्गत विशेष निर्णय घेण्यात येतात, जेणे करुन व्यवसायाचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल. Tactical Plan मध्यम पातळीच्या व्यवस्थापकांद्वारे बनवला जातो. Tactical Plan व्यवसायाच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनशी संलग्न असतो.

उदाहरणार्थ: व्यवसायाचे ५० कोटीचे ध्येय साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या उत्पादन क्षमतेमध्ये ३०% वाढ होणे आवश्यक आहे, अशी जर स्ट्रॅटेजिक प्लॅनमधील प्राधन्यता असेल तर ती साध्य करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग विभागाअंतर्गत Tactical Plan बनविण्यात येईल. त्या अंतर्गत पुरवठादार, उत्पादन प्रक्रीया, नविन यंत्रसामुग्री विकत घेणे, डिलिव्हरी प्रक्रीया, दर्जा इ. बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात. त्यांच्या अंमलबजावणीमुळे स्ट्रॅटेजिक प्लॅन साध्य होतो. Tactical Plan ची वास्तवात कृती स्वरुपात अंमलबजावणी होण्यासाठी Operational Plan तयार करवा लागतो.

3. Operational Plan: व्यवसायातील दैनंदिन कामकाज ज्या प्रक्रीयेद्वारे चालते त्याला Operational Plan म्हणतात. Operational Plan मुळे Tactical Plan व्यवस्थित पार पडतो. Operational Plan कर्मचार्‍यांद्वारे बनवला जातो. ठरवलेल्या Strategic व Tactical Plan ची अंमलबजावणी Operational Plan मुळे होते. ठरवलेल्या सर्व निर्णयांना अनुसरुन नेमकी कृती या पातळीवर होते.

उदाहरणार्थ: कंपनीचे ५० कोटीचे ध्येय साध्य करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग विभागाने जे निर्णय Tactical Plan दरम्यान घेतलेत्याची जबाबदारी विशिष्ट व्यक्तीला देण्यात येते, त्याची कालमर्यादा ठरवण्यात येते व त्याचा आढावा घेतला जातो.

4. Contingency Plan: ठरविलेल्या प्लॅननुसार जर गोष्टी झाल्या नाहीत तर आधीपासुन ठरवलेला दुसरा प्लॅन म्हणजेच Contingency Plan मित्रांनो, Tactical Plan व Operational Plan हे खरं तर व्यवसायाचा Strategic Plan लाच संलग्न असे प्लॅन असतात. Strategic Plan खर्‍या अर्थाने कंपनीला दिशा दाखवणारा असतो परंतु त्या दिशेने कंपनी नेण्याची कृती मात्र Tactical आणि Operational Plan ठरवतात. व्यवसायाचा Strategic Plan विकासाची दिशा दाखवतो व व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरतो. Strategic Plan तयार करताना व्यवसायाच्या दुरगामी भव्य ध्येयाचा विचार करणे गरजेचे आहे. खालील पायऱ्यांचा वापर करुन Strategic Plan तयार केला जाऊ शकतो.

१. व्यवसायाचे भव्य ध्येय ठरवणे.
२. SWOT Analysis (आगामी लेखात सखोल माहिती मिळवू.)
३. व्यवसायाचा USP निर्माण करणे (आगामी लेखात या संदर्भात माहिती मिळवू.)
४. व्यवसायाचे भव्य ध्येय साध्य करण्यासाठी पुढील ३ ते ५ वर्षात कोणते ध्येय साध्य केले पाहिजे ते ठरवणे.
५. व्यवसायाची बाजारपेठ ठरवणे.
६. ३ ते ५ वर्षांच्या ध्येयाला अनुसरुन वार्षिक ध्येय ठरवणे.
७. वार्षिक ध्येयाला अनुसरुन तिमाही किंवा मासिक ध्येय ठरवणे.


बऱ्याच लघु व्यवसायामध्ये असे आढळून येते की उद्योजक आपल्या व्यवसायाचा विकास आराखडा तयारच करत नाहीत, केला तरी तो लिखित स्वरुपात नसतो. त्यामुळे कित्येक लघु उद्योजकांचा व्यवसाय आहे तेवाढाच राहतो. व्यवसायाचा विकास होत नाही टर्नओवर, ग्राहकांची संख्या सर्व जैसे थे! अशा व्यवसायाअंतर्गत दिशाहीन कामकाज असते. कर्मचारी सुध्दा थकलेले व गोंधळलेले असतात. सद्यपरिस्थिती हाताळण्यावर जास्त भर या व्यवसायांचा असतो. बाजारपेठेत संधी असुन सुध्दा असे व्यवसाय प्रगती करु शकत नाहीत.

मित्रांनो, मी आपल्याला आवाहन करु इच्छितो की, व्यवसायाच्या विकासाचा आराखडा बनवा. कसा बनवावा हे माहीत नसेल तर शिका. गप्प बसु नका. आराखडा कागदावर उतरवा व त्यावर अंमलबजावणी करुन कृती करा. पुढील लेखामध्ये आपण व्यवसायाचे SWOT Analysis बद्दल जाणून घेऊया.

- अतुल राजोळी

SHARE THIS

->"Business plan व्यवसायाचा आराखडा"

Search engine name