How to make Murmur मुरमुरे कसे बनवतात | मुरमुरे (Murmure ) प्रक्रिया उद्योग संपूर्ण माहिती


🍚 *मुरमुरे कसे बनवतात | मुरमुरे (Murmure ) प्रक्रिया उद्योग संपूर्ण माहिती* 


👉मुरमुरेंची निर्मिती तांदुळा पासून केली जाते. 

राज्यातील काही भागात त्यास चुरमूरे असेही म्हणतात. भेळ, भडंग, लाडू चिवडा इ. खाद्यपदार्थ तयार करणेसाठी मुरमुरेंचा मोठया प्रमाणावर वापर होतो. शिवाय तिर्थस्थानी मंदिरामध्ये प्रसाद तयार करणेसाठी अथवा तुलसी विवाहासारख्या कार्यक्रमात प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यासाठी मुरमुरे वापरले जातात. शिवाय आज लोक फक्त मुरमुरे खाण्यासाठीही वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. फार पूर्वी ग्रामीण भागातील काही कुटूंबे घरगुती पातळीवर मुरमुरे निर्माण करीत होते. आजूबाजूचे शेतकरीही सदरच्या व्यक्तीकडून तांदूळ देउन मुरमूरे तयार करून घेत पण आज चित्र बदलल आहे. धावपळीच्या या आधुनिक यूगात भात मुरमुरे युनिटवर नेउन मुरमुरे तयार करून घेण्याइतपत वेळ नाही परिणामी सर्वत्र तयार मुरमुरे विकत घेणेच आज पसंद केले जात आहे. शहरी भागात तर वेळेअभावी चुरमूरे मुरमुरे आणि त्यापासून बनविले जाणारे इतर पदार्थही विकत घेण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. झपाटयाने वाढत चाललेली आजची लोकसंख्या आणि बदलती खाद्य संस्कृती विचारात घेता तसेच वरील परिस्थितीचा विचार करता मुरमुरे निर्मिती आणि विक्री उद्योगास भरपूर वाव असल्याचे दिसते. भातापासून मुरमुरे तयार करणे हा एक तांत्रिक उद्योग असल्याने आज फक्त हे तंत्र माहिती असणारे लोकच हा व्यवसाय करतात.चला तर मग जाणून घेऊयात मुरमुरे कसे बनवतात.

 *मुरमुरे निर्मितीच्या पद्धती* 

👉मुरमुरे तयार करण्यासाठी भात गिरणीतून तयार झालेला तांदूळ ताबडतोब वाळू बरोबर गरम केला जातो. असा तांदुळ लगेचच फुगतो व मोठा होतो, परंतु उकडा तांदुळ जर वाळू बरोबर गरम केला तर जास्त लांबतो यामुळेच मुरमुरे तयार करण्याच्या प्रक्रियेत कच्चा तांदुळापेक्षा उकडा तांदुळच जास्त प्रमाणात वापरला जातो. मुरमुरे निर्मितीच्या प्रामुख्याने २ पद्धती आहे एक म्हणजे पारंपारिक पद्धत व दुसरी आहे ती प्रगत पद्धत.

 *पांरपारिक पद्धत* 

👉घरच्या घरी मुरमुरे बनविण्याच्या पद्धतीत भात गरम पाण्यात २४ तास भिजवितात नंतर पाणी काढुन टाकून तो भात कढयांमधून वाळू बरोबर भाजतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या भट्टया व कढया वापरतात. यामधून कोरडा उकडा भात मिळतो. हा भात नंतर सुर्याच्या उष्णतेने वाळविला जातो. वाळविलेला भात नंतर हलर गिरणीतून भरडला जातो या प्रक्रियेत कोंडा, तुस व तांदुळ मिळतो. तुस याच भट्टयासाठी इंधन म्हणून वापरतात तर तांदूळाचा ओलावा कमी करण्यासाठी तो कढई द्वारे तापविला जातो. हा तांदूळ नंतर मिठाच्या द्रावणाबरोबर मिसळविला जातो. मिठाच्या द्रावणासह असणारा तांदूळ पुन्हा एकदा भट्टीवर कढईतून जास्त प्रमाणाच्या आचेवर काही सेकंद भाजला जातो. याचवेळी त्यापासून मुरमुरे तयार होतात.

 *प्रगत पद्धत* 

👉प्रगत पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीत थोडाफार बदल करून मुरमुरे बनवितात. यामध्ये प्रामुख्याने दोन तीन बाबींचा विचार केला आहे. एक म्हणजे उकडा भात की ज्यामध्ये तांदूळ फुगीर व लांबट होतो आणि दुसरे म्हणजे मुरमुरे बनविण्याच्या प्रक्रियेत एकसंधता आणणे. तिसरी अंत्यत महत्वाची बाब म्हणजे जुन्या पद्धतीत वापरण्यात येणा-या कढया व भट्टया ऐवजी यंत्राद्वारे मुरमुरे तयार करतात. उकडा भात बनविण्याच्या पद्धतीपैकी (वाफेद्वारे, कोरडी गरम हवा व दाबाद्वारे) कोरडी गरम हवेद्वारे केले जाणारे उकडीकरण मुरमुरे बनविण्याच्या प्रक्रियेत अंत्यत चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे. जितके उकडीकरण चांगले तितके पफींग चांगले असे म्हणता येईल. मुरमुरे बनविण्याच्या आधुनिक पद्धतीमध्ये प्रथम भात  (साळ) स्वच्छ धुतला जातो, किंवा बायसल्फाईट द्रावणात टाकून धूतला जातो. मात्र या प्रक्रीयेत भात पाण्यात अथवा बायसल्फाईट द्रावणात भिजत न ठेवता फक्त काही काळच ठेवून ते द्रावण काढून टाकले जाते.

👉यानंतर हा भात (साळ) एका भांडयात घेवून त्यावर २ ते २.५ किलो प्रति चौरस सें.मी. दाब या प्रमाणात वाफ सोडून १५ मिनिटानंतर हा भात वाळवणी यंत्राद्वारे अथवा उन्हात वाळवला जातो. १२ ते १३ टक्के ओलाव्याला आल्यानंतर हलर गिरणीतून भरडला जातो. या प्रक्रियेत आपणास उकडा भात मिळतो की जो मुरमुरे बनविण्याच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त लांबट व फुगीर बनतो. असा भात साधारणपणे मुळ भातापेक्षा १० ते १२ टक्के लांबतो. नंतर हा तांदूळ जून्या पद्धतीप्रमाणेच प्रक्रिया करून मुरमुरे बनविण्यासाठी वापरला जातो. आधूनिक पद्धतीद्वारे मिळणारा तांदूळ ही थोडासा तांबूस रंगाचा असतो त्यामुळे मुरमुरेही तांबुस रंगाचे बनतात. तांबुस रंग नको असल्यास (साळ) २ टक्के सोडीयम बाय सल्फाईटच्या द्रावणबरोबर धुवून घेण्याची पद्धत आहे. 

 *महत्वाची माहिती:* 

👉मुरमुरे तयार करण्यासाठी घेतलेल्या हलर यंत्राचा वापर घरघंटी म्हणुन आटा चक्कीसाठी सुद्धा करू शकतो.

👉 या उद्योगासाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आवश्यक आहे.
👉 उद्योगासाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता गरजेची आहे.
👉 मुरमुरे प्रक्रियेत तयार होणारे भुस / कोंडा विक्री करून जास्तीचे उत्पादन मिळवू शकते.

 *मुरमुरे उद्योगासाठी उपलब्ध बाजारपेठ* 


👉कोणताही प्रक्रिया / उद्योग उभारणीसाठी बाजारपेठ/ग्राहक ही महत्त्वाची बाब असते. मुरमूरेसाठी किरकोळ दुकाने, भेळ सेंटर, फरसाण मार्ट, बेकरी, हॉटेल्स, मिठाईची दुकाने मॉल यांना मुरमुरे घाउक पद्धतीने विकता येतील याशिवाय आठवडा बाजार, मार्केट, जत्रा, तिर्थक्षेत्र, पर्यटनाच्या ठिकाणी मुरमुरेची विक्री शक्य आहे.

 *मुरमुरे उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ* 


👉साधारणतः १ क्वींटल/ दिवस मुरमुरे उत्पादन करण्याची क्षमता असलेले मुरमुरे यूनीट सुरू करण्यासाठी, १ कुशल १ मदतनीस, १ विक्रेता अशी एकूण ३ कामगारंची आवश्यकता असते. साधारणतः वर्षातील ३०० दिवस सदरचा उद्योग चालेल असे अपेक्षित असल्याने सदर मनुष्यबळाची उपलब्धता ही कायमस्वरूपी राहील याची काळजी घ्यावी लागेल.

 *मुरमुरे उद्योगासाठी आवश्यक कच्चामाल* 

 
मुरमूरे निर्मितीसाठी कच्चा माल साळ खरेदी करताना खालील बाबी ध्यानात ठेवाव्यातः

👉 चांगली पोसलेली व स्वच्छ साळ निवडावी

👉 काढणीनंतर साळीची हाताळणी योग्य पद्धतीने केलेली असावी

👉 साळीवर जास्त प्रमाणात रसायनाचा वापर केलेला नसावा

👉 साळीची योग्य पॅकिंग होउन त्याची वाहतुकी दरम्यान जास्त हेळसांड झालेली नसावी

👉 साळ चांगली वाळलेली असावी. शिवाय ती चांगल्या पद्धतीने साठविलेली असावी

👉 साळीची खरेदी साधारणतः मालाची आवक जास्त असताना करावी जेणेकरून कमी किंमतीत उत्तम प्रतीची साळ मिळेल. 

 *मुरमुरे व्यवसायाची जागा आणि इमारत* 

👉उदयोगासाठी जागेची निवड करताना त्याठिकाणी वाहतूक, पाणी, वीज इ.ची उपलब्धता असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. याच बरोबर जागेची निवड जेथे कच्चा माल सहज आणि मोठया प्रमाणात होईल आणि शिल्लक राहणा-या टाकावू मालाची विल्हेवाट लावणे शक्य होईल अशा ठिकाणी करावी यामुळे उत्पादन निर्मिती सातत्याने चालू राहू शकेल आणि टाकावू मालामुळे इतराना त्रास ही होणार नाही. सदर जागा ही रस्त्यालगत मोक्याच्या ठिकाणी असली पाहिजे जेणेकरून उत्पादित मालाची ने आण करण्याच्या दृष्टिने सुलभता येईल.प्रक्रीया उद्योगाच्या जागेवर पाण्याची मुबलक सुविधा असली पाहिजे कारण आपला प्रक्रिया उद्योगाचा पाणी हा अविभाज्य घटक आहे. त्याचप्रमाणे उद्योगाअंतर्गत कार्य करणा-या मजुरांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा असली पाहिजे.उद्योग उभारणी करीत असतांना मशीनरीज साठी विज लागते तर विज सुद्धा प्रक्रिया उद्योगाच्या जागेवर उपलब्ध असली पाहिजे.

 *मुरमुरे उद्योग आवश्यक मशिनरी* 


खालील यंत्रसामुग्री व इतर साहीत्य सदरचा उद्योग उभारणीसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

👉 मोठया आकाराच्या कढया – २ नग,

👉 हलर यंत्र

👉  टोपल्या

👉 सुपे

👉 बादल्या

👉 उलथणी

👉 लोखंडी झारी / चाळणी

👉 अॅल्यूमीनीयचे मोठे टोप


 *तात्पर्य* 

👉मुरमुरे उद्योगा विषयी माहिती आपल्याला देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न या लेखा मध्ये करण्यात आलेला आहे. आपल्याला जर मुरमुरे निर्मिती उद्योग करायचा असेल व अधिक माहिती हवी असल्यास हा उद्योग सुरू करण्यापूर्वी मुरमुरे उद्योग सुरू असलेल्या प्लांट ला आपण एकदा अवश्य भेट द्यावी.तुम्हाला तुमच्या भावी उद्योगासाठी शुभेच्छा.

🎯 व्यवसाय साक्षर व्हा.....

🎯 उद्योजक बना....SHARE THIS

->" How to make Murmur मुरमुरे कसे बनवतात | मुरमुरे (Murmure ) प्रक्रिया उद्योग संपूर्ण माहिती"

Search engine name