महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान

1.      महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान
2.      योजनेची वैशिष्ट्ये

महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान

पाणी उपलब्धतेसाठी वरदान
पाण्याची उपलब्धता आणि वारंवार येणारी दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता जलसंवर्धनाच्या कार्यक्रमाला अनन्य साधारण महत्व आहे. राज्यात काही भागात दरवर्षी प्रचंड पाऊस होत असला तरी उन्हाळ्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. जलस्त्रोताचे बळकटीकरण आणि पावसाचे पाणी अडवून अशा परिस्थितीवर मात करता येऊ शकते. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातील जल, भूमी व इतर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये स्थायी स्वरुपात सुधारणा करण्याच्या दृष्टीने राज्यात मुख्यत: स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या लोकसहभागातून मे 2002 पासून राज्यात महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानास सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या अभियानातून गावातील/ गावाजवळील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यासाठी गाळ काढण्यावर भर देण्यात येत आहे.


योजनेची वैशिष्ट्ये

  • जलसिंचन उपलब्धता वाढविणे, पाणी व माती यांचे संवर्धन करणे, पडिक जमिनीचा विकास करणे, रोजगाराच्या उपलब्धतेत आणि पर्यायाने कृषी उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
  • अभियानांतर्गत अनेक गावात लोकसहभागातून जलस्त्रोतांचे पुनर्भरण, तलावांची दुरूस्ती, पाझर तलाव किंवा गावतलावातील गाळ काढणे, नालाबांधातील गाळ काढणे, नालाबांध दुरुस्ती आदी कामे करण्यात आलेली आहेत.
  • या कामाचे दृष्य परिणाम दिसून आल्याने जलसंधारणाच्या कामाला जनतेचा प्रतिसाद वाढत आहे.
  • या अभियानांतर्गत गाळ काढणे, लघु सिंचन योजना/ बंधारे/ बांध दुरुस्ती, मुलस्थानी जलसंधारण, विहिर पुनर्भरणाची तयारी आदी कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात येतात.
  • पावसाळ्यानंतर कच्चे बंधारे, वनराई बंधारे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना गेट बसविणे आदी कामे घेण्यात येतात.
  • यावर्षी गावातलगतचे सर्व तलाव, बंधारे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असणाऱ्या सार्वजनिक विहीरी यामधील गाळ काढण्यास प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबिण्यात येते.
  • जलसंधारणाच्या विविध योजनेतील बंधाऱ्यात पावसाच्या पाण्याबरोबर आलेला गाळ साचत असल्याने निश्चित असलेला पाणीसाठा होऊ शकत नाही. त्यामुळे मिळणाऱ्या लाभापासून शेतकरी वंचित राहतो. अशा बंधाऱ्यातील गाळ उन्हाळ्यात ग्रामपातळीवर पुढाकार घेऊन केल्यास पावसाळ्यात चांगला पाणीसाठा होऊ शकतो. जलस्त्रोतातून निघालेला गाळ सुपिक व कसदार असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो.
  • लोकसहभागातून हे अभियान राबविण्यात येणार असले तरी या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व मागास भागासाठी अनुदान निधी योजना या योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीचा देखील उपयोग करता येणार आहे. यामुळे लोकांच्या श्रमदानाला योजनांचे आर्थिक पाठबळ लाभणार आहे.
  • राज्यात उन्हाळ्यातील टंचाईवर मात करण्यासाठी वनराई व कच्चे बंधाऱ्याच्या माध्यमातून वाहून जाणारे पावसाचे पाणी जास्त उपयुक्त ठरु शकते.
  • लहान प्रवाहांना अडवून पाणी संचय केल्यास परिसरातील स्त्रोतांना पाणी उपलब्ध होऊ शकते. याचा उन्हाळ्यात फायदा होतो.
  • रत्नागिरी जिल्ह्यात कृषी विभागामार्फत गेल्या वर्षात मार्च 2014 अखेर 434 वनराई बंधारे आणि कच्चे बंधारे तयार करण्यात आले.
  • तसेच 16 शिवकालीन पाणी साठवण योजना पूर्ण करण्यात आल्या.
  • तसेच तलावातील गाळ काढणे, पाणलोट विकास, जलस्त्रोत बळकटीकरण आदी कामे देखील केली जात आहेत. या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळाल्यास त्याचा लाभ ग्रामीण भागाला विशेषत्वाने होऊ शकेल.
  • जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून हे अभियान राबविले जात आहे.

शिवाय तरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामीण भागातील जनतेने या अभियानात जास्तीत जास्त सहभाग घेऊन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढे आल्यास पाण्याच्या उलब्धतेबरोबरच कृषी उत्पादन वाढीसाठीदेखील त्याचा लाभ होऊ शकेल यात शंका नाही.


-
जिल्हा माहिती कार्यालय,
रत्नागिरी स्त्रोत : ई-योजना

SHARE THIS

->"महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान "

Search engine name